Wednesday, April 23, 2008

चौकातले ट्रूल

प्रश्न : मी गेल्या आठवड्यातच एक नवीन स्कोडा घेतली. दोन दिवसांपूर्वी मी माझी छान नवीन गाडी घेऊन एका चौकातून चाललो होतो, तर दुसऱ्या बाजूने एक जुनी होंडा अकोर्ड आली. वास्तवीक ती गाडी जुनी असल्याने त्याची आजची किम्मत माझ्या नवीन स्कोडापेक्षा कमीच आहे, तेंव्हा त्यानी मला आधी जाऊन दिले पाहिजे, पण हा मॅन स्वत:ची अकोर्ड माझ्या स्कोडापेक्षा जास्त महाग असल्यासारखा सरळ माझ्या अगोदर चौकातून पुढे निघून गेला. अशावेळी मी काय करावे? - औंधमधील एक नवश्रीमंत

ट्रुल : नवश्रीमंत, प्रथम तुमच्या नवी स्कोडाबद्दल अभिनंदन! स्कोडा व अकोर्ड गाड्या साधारण एकाच मापाच्या असल्यामुळे तुमचा प्रश्न योग्य आहे, नाहितर अर्थातच मोठ्या गाडीने आधी जायचा ट्रूल आहे. ह्याला अपवाद अर्थातच अतीश्रीमंताच्या मर्सिडीज किंवा पोलिसांच्या किंवा छपरावर दिवा असलेल्या सरकारी गाड्या - ह्या गाड्यांना अर्थातच आधी जाण्याचा हक्क असतो.

तुमच्या बाबतीत जर ती अकोर्ड नव्या अकोर्डसारखीच हुबेहूब दिसत असेल, तर असा गोंधळ होणं सहाजिकच आहे. अशा वेळेला जाणकार नंबरप्लेट कडे बघुन गाडी किती जुनी आहे ह्याचा अंदाज लावतात. तुमची जर खात्री असेल, की ती गाडी जुनी आहे तर खरं म्हणजे तुम्ही थांबायचंच नाही. असं केल्याने अकोर्डवाल्याला आपली चूक लक्षात आली असती व तो तुमच्यासाठी थांबला असता. एखादा उद्धट ड्रायवर अशाही वेळेला पुढे सरसावतो, पण मग तुमची गाडी जास्त दणकट आहे म्हणून नुकसान त्याचेच होईल. त्यातून अकोर्डनी पडलेला पोचा स्कूटरच्या पोच्यापेक्षा छान दिसतो, तेंव्हा तुमचं फारसं नुकसान होणार नाहीच.

रॉंग साईड

प्रश्न : परवा मी एका छोट्याश्या गल्लीत नो एंट्रीतून माझी चारचाकी गाडी घातली आणि एका बेजबाबदार जोरात चालवणाऱ्या मोटरसायकलवाल्यानी मला चक्क समोरून धडक दिली. वर हा निर्लज्ज इसम मला चक्क शिव्या हासडतो तर अशा वेळेला मी काय करू ? -- पुण्यातील एक त्रस्त नागरीक

ट्रूल: अहो 'त्रस्त', ती वेळ जर ट्रॅफिकची नसेल (म्हणजे रात्री नऊ नंतर व सकाळी नऊ च्या आधी किंवा दुपारी एक ते संध्याकाळी पाचच्या मध्ये) तर तुम्ही रस्ता तुम्हाला हवा तसा वापरणं हक्काचंच आहे. त्यातून तुम्ही जर रस्त्याच्या डाव्या बाजूनी जात असाल, तर चूक मोटरसायकलवाल्याचीच आहे आणि त्यानी तुम्हाला शिवी देणं योग्य नाही. पण आजकाल जमाना इतका वाईट आहे, की अशा वेळेला सोडून देणंच बरं पडतं. पुन्हा जर तुम्हाला असा अनुभव नको असेल तर एखाद्या राजकीय पक्षाचं निशाण गाडीच्या पुढच्या व मागच्या पाटीवर चिकटवावे. सत्तारूढ पक्षाचे लावल्यास पोलिसदेखिल त्रास देणार नाहीत.