Tuesday, June 24, 2008

डिव्हायडरची दखल

प्रश्न : गेल्या वर्षभरात पुणे महानगरपालिकेनी (म्हणजे ज्याला आपण कार्पोरेशन म्हणतो त्यांनी) लॉ कॉलेज रस्त्यावर डिवायडर बसवले. हे डिवायडर रस्त्याच्या मध्यभागी अचानकच सुरू होत असल्यामुळे ते लांबून दिसत नाहीत. गेले अनेक महिने त्या डिवायडरवर एक चारचाकी गाडी अडकून बसली होती (त्या बिचाऱ्या इंडिकावाल्यालापण तो डिवायडर न दिसल्याने). तर त्या इंडिकामुळे तो डिवायडर स्पष्ट दिसायचा. काल रात्री मी तिकडून जात होतो तर ती गाडी तिथून काढल्याने मला तो डिवायडर कुठे सुरू होतोय ते दिसले नाही आणी माझी स्कूटर त्यावर धडकली आणि मला जोरदार मुका मार बसला. शिवाय मदतीला आलेल्या काही उत्साही तरुणांनी माझा सेलफोन गायब केला ही गोष्ट वेगळीच. सुदैवाने तरीपण माझी स्कूटर चालवण्याच्या स्थितीत असल्याने मी घरी पोहोचू शकलो. माझं पुणे कार्पोरेशनला गाऱ्हाणं आहे की त्यांनी ती इंडिका पुन्हा होती तिथे परत ठेवून द्यावी म्हणजे सगळ्यांना तो डिवायडर नीट दिसेल. आणि आजकाल अनेकांना त्या डिवायडरची सवय झाल्याने त्यावर अजून एखादी गाडी तितकी अडकायला वेळ लागेल. अशी न सांगता ती गाडी काढून टाकणं म्हणजे कार्पोरेशनचा सपशेल बेजबाबदारपणा आहे!

- कोथरूडमधील एक घायाळ नागरीक

ट्र्ल : बरं का घायाळ, तुमचं पत्र मिळाल्यानंतर मी पुणे कार्पोरेशनमध्ये विचारपूस केली. त्या दिवशी कोणीतरी मंत्रीसाहेब कार्पोरेशनला भेट देणार होते म्हणून तिथे योग्य व्यक्तिही भेटली. त्यांना हे गाडी काढण्याचं प्रकरण माहित नव्हतं. ते म्हणाले की कदाचित नो पार्किंग मध्ये लावली आहे म्हणून पुण्यातल्या पार्किंगवाल्या खासगी कंत्राटदारांनी ती उचलली असेल. ते म्हणाले की जरी लॉ कॉलेज रस्ता नुकताच नव्याने केलेला असला तरी ड्रेनेजच्या कामांसाठी तो लवकरच खणण्यात येणार आहे. तो खणल्यानंतर डिवायडरच्या एका बाजूचा रस्ताच बंद होईल व हा धोका उरणार नाही. अर्थात खड्ड्यात कोणतीतरी रिक्षा वगैरे अडकेपर्यंत खड्ड्यात न पडण्याची काळजी घ्यावी.